नाशिक व त्र्यंबकनगरीला चढणार भगवा रंग

नाशिक व त्र्यंबकनगरीला चढणार भगवा रंग

ध्वजारोहणानिमित्त ‘हर घर भगवा’ अभियानातून एक लाख ध्वज लावणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी नाशिकमध्ये ‘हर घर भगवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या अभियानांतर्गत नाशिकसह त्र्यंबकेश्वर शहरातील घराघरांवर भगवे ध्वज फडकावण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून तब्बल एक लाख भगवे ध्वज लावण्याचे उद्दिष्ट असून, नागरिकांच्या सहभागातून दोन्ही शहरांना भगवा रंग चढणार आहे.

कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर अर्थात रविवारी (दि.२५) या महाअभियानाचा शुभारंभ होणार आहे. अभियान अधिक व्यापक स्तरापर्यंत पोहोचावे, यासाठी दोन हजारांहून अधिक बूथप्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय, शहरातील आमदार व नगरसेवकांच्या मार्गदर्शनातून शहरात भाजपचे १,०४७ व शिवसेनेच्या एक हजार बूथप्रमुखांच्या माध्यमातून अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नाशिकमध्ये ७५ हजार तर, त्र्यंबकेश्वरात २५ हजार ध्वज

या अभियानाची व्याप्ती लक्षात घेता नाशिकसह इंदूर, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर येथेही ध्वज वितरणासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेले ध्वज नाशिकमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून व्यापक जनसहभागाची जोड मिळणार आहे.

कुंभमेळा हा धार्मिक सोहळ्यासह भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. देशभरातून लाखो भाविक आणि साधू-महंत येणार असल्याने, त्यांच्या स्वागतासाठी शहरात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. भगवा ध्वज हा संस्कृती आणि धर्माचे प्रतीक आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात असून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील सांस्कृतिक वातावरणनिर्मितीसाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे.

🎥 व्हिडिओ बातम्या पाहायच्या आहेत? कुंभमेळा २०२७ चे व्हिडिओ, वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेलवर पाहा.

▶ YouTube चॅनेल पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *