नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे जोरदार स्वागत व्हावे आणि त्यातून भक्ती-संगीत-संस्कृती आणि सामाजिक कृतज्ञतेचा संगम घडून यावा, या हेतूने जुने नाशिक प्रतिष्ठानच्या वतीने १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘नाशिक महोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेंच्या गायकीचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
गंगाघाटावरील गौरी पटांगणावर १४ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. महोत्सवानिमित्त १२ व १३ नोव्हेंबरला यशवंत महाराज पटांगणावर गायन स्पर्धेच्या ऑडिशन्स घेतल्या जात आहेत. यातून निवडलेल्या तीन उत्कृष्ट गायकांना अवधूत गुप्ते यांच्या व्यासपीठावर हजारो प्रेक्षकांसमोर कला सादरीकरणाची संधी मिळणार आहे. १४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात हर्षवर्धन वावरे, आदित्य पाटेकर, सोनाली सोनवणे आणि कस्तुरी साईराम सहभागी होणार आहेत. पारंपरिक अभंग-भजन आणि आधुनिक संगीताचा संगम असलेला ‘भजन क्लबिंग’ हा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
पुरस्कारांचे वितरण
ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक गजानन शेलार यांना ‘लोकनेते पुरस्कार’ तर, आयएएस अधिकारी स्वप्निल पवार यांना ‘जुने नाशिक गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. यावेळी पवार यांच्या आई-वडिलांचाही सन्मान होणार आहे. कुंभमेळा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील असलेले जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही कृतज्ञता सन्मान यावेली केला जाणार आहे. जुन्या नाशिकचा ऐतिहासिक वारसा, पुनर्विकास, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्न शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा महोत्सवाचा उद्देश असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदन भास्करे यांनी दिली.







Leave a Reply